एकाच दिवसात 1 कोटी 58 लाख रुपयांच्या वीजचोरीची प्रकरणे उघडकीस

पुणे, 12 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वीजचोरी केली जात आहे. अशा वीजचोरीच्या प्रकरणांचा शोध लावण्यासाठी महावितरण कंपनीने विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत एका दिवसात सुमारे 1 कोटी 58 लाख रुपयांच्या वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. विशेष म्हणजे, ही करवाई केवळ पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर , सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे. जर केवळ पश्चिम महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात वीज चोरीची प्रकरणे उघडकीस येत असतील तर, संपुर्ण महाराष्ट्रात वीज चोरीची किती प्रकरणे सापडतील? याचा विचार करण्याची गरज आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने संपुर्ण महाराष्ट्रात वीजचोरी करणाऱ्याच्या विरोधात देखील अशाच प्रकारे मोहीम राबविण्याची गरज आहे.

एकाच दिवशी कारवाई

तत्पूर्वी, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये वीजचोरी विरोधात मोहीम राबविण्याचे आदेश महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार, महावितरण कंपनीच्या पथकाने एकाच दिवशी या 5 जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी छापा टाकून वीजचोरीच्या प्रकरणातील दोषींना दंड ठोठावला. यामध्ये महावितरणकडून घरगुती, शेती, औद्योगिक आणि विविध कार्यालयांची तपासणी करण्यात आली होती.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक वीजचोरी

या कारवाईत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. पुणे जिल्ह्यात 1 कोटी 28 लाख रुपयांची 662 वीजचोरीची प्रकरणे आढळून आली आहेत. सोलापूर जिल्ह्यात 12 लाख 57 हजार रुपयांच्या 223 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. सांगली जिल्ह्यात 9 लाख 43 हजार रुपयांची वीजचोरीची प्रकरणे आढळून आली आहेत. सातारा जिल्ह्यात 5 लाख 84 हजार रुपयांची 78 वीजचोरीची प्रकरणे सापडली आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 लाख 48 हजार रुपयांची 69 वीजचोरीची प्रकरणे उजेडात आली आहेत. या वीजचोरी प्रकरणी महावितरण कंपनीने दोषींना दंड ठोठावला आहे. दरम्यान, वीजचोरीच्या गुन्ह्यात एखादा व्यक्ती दोषी आढळल्यास त्याला दंड व 3 वर्षांपर्यंत तुरूंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी वीजचोरी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *