बारामती शहर व तालुक्यात मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विशेष अभियान सुरू

बारामती, 10 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) ज्या नागरिकांचे वय दि.01 जुलै 2024 पर्यंत 18 वर्षे पुर्ण झाले आहे, त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम ऑनलाईन व प्रत्यक्ष फॉर्म भरून मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ती सुविधा दि.25 जुलै 2024 ते दि.14 ऑगस्ट 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अभियानात भाग घेण्यासंदर्भात सुचना दिल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना

बारामती तालुक्यात आणि शहरामध्ये 376 मतदान केंद्र (बुथ) स्थापन करण्यात आले आहेत. निवडणूक विभागातील तहसिलदार कार्यालयाकडून प्रत्येक बुथवर एक मतदान केंद्रस्थरीय अधिकारी (BLO) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रत्येक बुथवर एक मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) नेमण्यात आले आहेत. तसेच याआधी 19 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत ज्या मतदारांचे छायाचित्र, नाव दुरूस्ती, बदल, स्थलांतर, मयत मतदार यांचीही मतदार यादी पाहुन त्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. मतदान केंद्राबाबत काही अडचण असल्यास लेखी स्वरूपात राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात माहिती द्यावी.



तसेच या मोहिमेध्ये नविन मतदार नांव नोंदणी, नावातील दुरूस्ती, यादीतुन नाव वगळणे, मृत व्यक्तीचे नांव कमी करणे, हरकती घेणे, स्थालांतर, मतदार केंद्र बदलणे व मतदार यादी अद्यावत करण्यासाठी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) मतदारांच्या प्रत्यक्ष घरोघरी जावून पडताळणी करणार आहेत. तरी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते, बुथ कमिटी सदस्य, आजी माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांनी आपआपल्या गावामधील मतदान केंद्रावर (बुथवर) या मोहिमेची माहिती घेऊन दिलेल्या निवडणूक वेळापत्रकानुसार मतदार यादी संबधीत सर्व प्रक्रियामध्ये भाग घेऊन नवीन मतदारांच्या नोंदणी बरोबरच मयत मतदारांची प्रामुख्याने असलेली नोंदणी कमी करणे यासारखी कामे करून ही निवडणूक मोहीम आपआपल्या प्रभाग व गावामध्ये बुथवर सक्षमपणे राबवावी, अशा सूचना राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.



ज्यांचे वय 1 जुलै 2024 रोजी 18 वर्षे पुर्ण होत आहे. अशा मतदारांची मतदार नोंदणी BLO कडे आणि ऑनलाईन पद्धतीने नोंदणी आजही चालू आहे. मतदार नोंदणीसाठी अर्जदारांनी रहिवाशी पुरावा, जन्म दाखला व छायाचित्र (फोटो) सादर करणे बंधनकारक आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत खालील पद्धतीने नाव नाव नोंदणी सुरू आहे. यामध्ये प्रभागातील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात नविन नावासाठी नमुना 6 अर्ज भरून देणे. पोस्टाव्दारे नमुना 6 अर्ज पाठविणे. NVSP येथे ऑनलाईन पद्धतीने नमुना 6 अर्ज भरून देता येईल. नागरी सुविधा सेवा केंद्रात (CSC) पद्धतीने नाव नोंदवता येईल. याशिवाय, मोबाईल व्होटर हेल्पलाईन ॲपद्वारे मोबाईल वरून ही मतदान नोंदणी करता येईल.

असा असणार अभियानाचा कार्यक्रम

या अभियानांतर्गत, बारामती शहर आणि तालुक्यात 25 जून ते 4 जुलै दरम्यान घरोघरी जाऊन BLO व्दारे पडताळणी करणे. मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, दुबार किंवा समान नोंदी व छायाचित्र मतदार ओळखपत्र संदर्भातील त्रुटी दूर करणे ही कामे केली जाणार आहेत. तसेच 5 जुलै ते 16 जुलै या कालावधीत विभाग किंवाभाग पुन्हा तयार करणे आणि मतदानाच्या क्षेत्राच्या किंवा भागांच्या सीमेच्या पुनर्रचनेचे प्रस्ताव अंतिम करणे आणि मतदान केंद्राची यादी मंजुर करणे, एका भागातील व एका इमारतीतील मतदार एकाच बुथ वर घेणे ही कामे करण्यात येणार आहेत. 25 जुलै रोजी एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 25 जुलै ते 09 ऑगस्ट यादरम्यान नवीन नोंदणी, दुरूस्ती, नाव वगळणे, मृत मतदार कमी करणे, आक्षेप व स्थलांतर करणे इत्यादी कामे केली जाणार आहेत. तसेच दि. 27, 28 जुलै आणि 03, 04 ऑगस्ट या दिवशी विशेष नोंदणी मोहिम राबविली जाणार आहे. तर 20 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *