दिल्ली, 09 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची निवड करण्यात आली आहे. या संदर्भातील घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे मावळते प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी-20 विश्वचषकापर्यंतच होता. त्यामुळे विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक कोण होणार? याबाबत अनेक नावांच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. यामध्ये गौतम गंभीरचे नाव आघाडीवर होते. अखेर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी आता गौतम गंभीरची निवड झाल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
https://x.com/JayShah/status/1810682123369816399?s=19
जय शाह यांची माहिती
याबाबतची माहिती जय शाह यांनी ट्विट करून दिली आहे. “भारतीय क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून यांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. आधुनिक काळात क्रिकेट झपाट्याने विकसित झाले आहे आणि गौतम गंभीर या बदलत्या परिस्थितीचा जवळचा साक्षीदार आहे. त्याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत विविध भूमिकांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तसेच मला विश्वास आहे की गौतम हा भारतीय क्रिकेटला पुढे नेणारा आदर्श व्यक्ती असेल. टीम इंडियासाठी त्याचा स्पष्ट दृष्टिकोन, त्याच्या विशाल अनुभवासह, त्याला ही रोमांचक आणि सर्वात मागणी असलेली कोचिंग भूमिका हाताळण्यासाठी पूर्णपणे तयार करते. या नवीन प्रवासात बीसीसीआय त्याच्यासोबत आहे आणि त्याला पूर्ण पाठिंबा देत आहे,” असे जय शाह यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://x.com/GautamGambhir/status/1810687507991781549?s=19
गंभीरची प्रतिक्रिया…
संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाल्यानंतर गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली आहे. भारत “ही माझी ओळख आहे आणि देशाची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विशेषाधिकार आहे. वेगळी टोपी परिधान करूनही मला परत आल्याचा अभिमान आहे. पण प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, हे माझे ध्येय नेहमीच राहिले आहे. निळ्या रंगातील सैनिक 1.4 अब्ज भारतीयांची स्वप्ने आपल्या खांद्यावर घेऊन जातात आणि ही स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन!” असे त्याने म्हटले आहे.
तिन्ही फॉरमॅटमध्ये प्रशिक्षक असणार
दरम्यान, गौतम गंभीर हा आता वनडे, कसोटी आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असेल. त्याचा कार्यकाळ साडेतीन वर्षांचा असणार आहे. तत्पूर्वी, गौतम गंभीरने आयपीएलमध्ये केकेआर आणि लखनौ सुपरजायंट्स या संघाच्या मेंटॉर पदाची भूमिका सांभाळली होती. यामध्ये गौतम गंभीर याच्या कार्यकाळात लखनौचा संघ दोनदा आयपीएलच्या प्लेऑफ मध्ये पोहोचला होता. तर गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. याच कामगिरीमुळे बीसीसीआयने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्याची निवड केली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये भारतीय संघ गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कशी कामगिरी करतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.