वरळी हिट अँड रन केस; आरोपी मिहीर शहा याला अटक

मुंबई, 09 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) वरळी परिसरात रविवारी (दि. 07 जुलै) हिट अँड रनची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याला आज पोलिसांनी अटक केली आहे. हा अपघात झाल्यानंतर मिहीर शहा फरार झाला होता. तेंव्हापासून त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. यासाठी मुंबई पोलिसांनी 14 पथके तैनात केली होती. दरम्यान, या अपघातातील आरोपी मिहीर शहा हा शिवसेनेचे पालघर उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. तत्पूर्वी वरळी परिसरात रविवारी पहाटे पाचच्या सुमारास एका बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात एका 45 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला होता.

https://x.com/ANI/status/1810622513514262832?s=19

https://x.com/ANI/status/1810587935776862337?s=19

जुहू परिसरातील बार सील

या अपघातावेळी राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा हा त्या कारमध्ये होता, हे पोलीस तपासात समोर आले आहे. फरार झाल्यानंतर मिहीर शहा याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी काल लूकआऊट नोटीस जारी केली होती. दरम्यान, या घटनेपूर्वी आरोपी मिहीर त्याच्या मित्रांसोबत जुहू परिसरातील एका पबमध्ये गेला होता, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर, अबकारी विभागाने जुहू येथील व्हाईस ग्लोबल तापस बार सील केला आहे. अपघातापूर्वी या बारमध्ये आरोपी मिहीर शहा गेला होता. उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या बारवर कारवाई करण्यात आली आहे.

राजेश शहा यांना जामीन मंजूर

तत्पूर्वी, हा अपघात झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी आरोपीचे वडील आणि शिवसेनेचे पालघर उपनेते राजेश शहा यांना अटक केली होती. त्यानंतर कोर्टाने राजेश शहा यांना सोमवारी जामीन मंजूर केला होता. त्यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. तर या अपघात प्रकरणात कार चालक राजऋषी राजेंद्रसिंग याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या अपघाताच्या पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *