पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर जाण्यास 31 जुलैपर्यंत बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

पुणे, 09 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) गेल्या काही दिवसांपासून राज्यभरासह पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे आदी पर्यटनस्थळ परिसरात 31 जुलै 2024 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. याठिकाणी वर्षाविहार आणि पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

https://x.com/Info_Pune/status/1808846570764341696?s=19

नागरिकांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी लोणावळा परिसरातील भुशी धरण येथील धबधब्यात पुणे शहरातील एकाच कुटुंबातील 5 जण बुडाले होते. तसेच येत्या दोन दिवसात पुणे जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा, इंदापूर या तालुक्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे आदी पर्यटनस्थळ परिसरात 31 जुलै 2024 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

या पर्यटन स्थळांवर असणार बंदी

यामध्ये इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव बोटिंग क्षेत्र, मावळ तालुक्यातील भुशी धरणासह इतर धरणे व गड किल्ले परिसर, धबधबे तसेच लोणावळा परिसरातील धरणे आणि गडकिल्ले परिसर, मुळशी तालुक्यातील मुळशी धरण, ताम्हिणी घाट जंगल परिसर, मिल्कीबार धबधबा, आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर, डिंभे धरण परिसर, कोंढवळ धबधबा, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, विविध धरणे व शिवनेरी किल्ल्यासह सर्व गडकिल्ले परिसर, हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, वरसगाव धरण, सिंहगड, गडकिल्ले परिसर, वेल्हा तालुक्यातील धरण व गडकिल्ले परिसर, कातळधरा धबधबा, भोर तालुक्यातील भाटघर धरण, धबधबे व गडकिल्ले परिसर आणि खेड तालुक्यातील चासकमान धरण व भोरगिरी घाट, पाण्याचे धबधबे या पर्यटनस्थळांवर जाण्यास 31 जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेशाचे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

https://www.facebook.com/share/p/26JpLLZWA8PTaPdi/?mibextid=oFDknk

जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर!

दरम्यान, पुढील काही दिवसांत पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्ह्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी (दि. 09 जुलै) रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये. तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी जिल्ह्यातील इयत्ता 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी सावधानता बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये. आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन ही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *