पुण्यात महिला पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक

पुणे, 06 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरात मद्यधुंद अवस्थेत एका व्यक्तीने महिला वाहतूक पोलिसाला आणि कर्मचाऱ्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे. पुण्यातील फरास खाना पोलीस ठाण्याजवळ शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय फकिरा साळवे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती

या घटनेसंदर्भात सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम्हाला बुधवार चौकातील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असलेला व्यक्ती आढळला. पोलिसांनी त्याला बाजूला घेतले. आम्ही त्याला सहकार्य करण्याची विनंती केली, पण त्याने वाद घालण्यास सुरूवात केली. त्याने आमच्याकडे पाणी पिण्यासाठी बाहेर जाण्याची विनंती केली. तो बाहेर गेल्यानंतर त्याने बाहेरून पेट्रोलची बाटली आणली आणि ती पेट्रोलची बाटली कॉन्स्टेबल आणि माझ्यावर टाकली, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी संजय फकिरा साळवेला अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे

https://x.com/ANI/status/1809460535542583356?s=19

नाना पटोलेंनी केला तीव्र शब्दांत निषेध

या घटनेचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. याचा परिणाम म्हणजे आता पोलिस अधिकारीही सुरक्षित नाहीत. लोकांना आता पोलिसांची भीती राहिली नाही. हे राज्य सरकारचे अपयश आहे. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात महिला पोलिसावर अशा प्रकारचा हल्ला होणे म्हणजे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळली आहे? याचा अंदाज लागतो, असे नाना पटोले यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *