झिम्बाब्वे विरुद्धच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरूवात, शुभमन गिलकडे भारतीय संघाचे नेतृत्व!

हरारे, 06 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज खेळविण्यात येणार आहे. दरम्यान, टी-20 वर्ल्डकपनंतर भारतीय संघातील विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या वरिष्ठ खेळाडूंनी टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे झिम्बाब्वेच्या दौऱ्यासाठी भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. तसेच या दौऱ्यासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद शुभमन गिल याच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे शुभमन गिल पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार आहे.

https://x.com/BCCI/status/1809127617448087745?s=19

झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक

या मालिकेतील पहिला सामना आज झिम्बाब्वेच्या हरारे स्पोर्ट्स क्लब स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. हा सामना दुपारी 4.30 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तर या मालिकेतील दुसरा सामना 7 जुलै रोजी होणार आहे. तसेच तिसरा सामना 10 जुलै, चौथा सामना 13 जुलै आणि पाचवा सामना 14 जुलै रोजी खेळविण्यात येणार आहे. तर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स चॅनल्सवर करण्यात येणार आहे. त्याचवेळी हा सामना SonyLiv या मोबाईल ॲपवर देखील लाईव्ह पाहता येणार आहे.

या मालिकेसाठी निवड झालेला भारतीय संघ:-

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार आणि तुषार देशपांडे.

या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल हे उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्याजागी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *