टीम इंडियाच्या विजयी रॅलीमध्ये लाखो लोक सहभागी, लोकांच्या गर्दीमुळे अनेकजण जखमी

मुंबई, 05 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) टी-20 विश्वचषकात टीम इंडियाने विजेतेपद पटकावले आहे. या विजयानंतर मुंबईत काल रात्री टीम इंडियाची खुल्या बसमधून विजयी रॅली काढण्यात आली. टीम इंडियाच्या या विजयी रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने प्रेक्षक सहभागी झाले. या खुल्या बसमधील रॅलीचा खेळाडूंनी मनापासून आनंद लुटला. या रॅलीदरम्यान पावसाचे वातावरण होते. तरी देखील प्रेक्षकांची रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. परिस्थिती अशी होती की सगळीकडे लोक दिसत होते. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. यादरम्यान रस्त्यावर प्रचंड गर्दी झाल्याने अनेक चाहते जखमी झाले. यामध्ये काहींना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला.

https://x.com/ANI/status/1808941193482678543?s=19

https://x.com/ANI/status/1808967464061186350?s=19

गर्दीमुळे अनेकजण जखमी 

यावेळी पोलिसांनी त्यांची कसेतरी तातडीने गर्दीतून सुटका करून त्यांना रुग्णालयात दाखल केले. अजूनही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय परेडदरम्यान 10 जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तर दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांपैकी एकाला फ्रॅक्चर झाले आहे. दुसऱ्याला श्वास घेण्यास त्रास होत होता, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या रॅलीसाठी लोकांची इतकी गर्दी झाली होती की, रॅलीनंतर रस्त्यावर लोकांच्या चपलांचा ढिगारा पडलेला दिसत आहे. तसेच मरिन ड्राइव्हच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या गाड्यांच्या छतांचे नुकसान झाले आहे. खेळाडूंच्या रॅली दरम्यान चाहते कारच्या छतावर चढले आणि सेलिब्रेशनमध्ये नाचू लागले, त्यामुळे गाड्यांचे नुकसान झाले आहे.

https://x.com/ANI/status/1808896229734297605?s=19

खेळाडूंना मिळाले 125 कोटींचे बक्षीस

दरम्यान, या विजयी रॅलीनंतर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा वानखेडे स्टेडियमवर सत्कार करण्यात आला. या भव्य कार्यक्रमात बीसीसीआय कडून विश्वविजेत्या भारतीय संघाला 125 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. हे 125 कोटी रुपये 15 सदस्यीय भारतीय खेळाडू 4 राखीव खेळाडू आणि 15 सदस्यीय सपोर्ट स्टाफमध्ये वाटण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या सपोर्ट स्टाफमध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक, 3 फिजिओ, व्यवस्थापक यांच्यासह काही सपोर्ट स्टाफमधील सदस्यांचा समावेश असणार आहे. दरम्यान, या 125 कोटी रुपयांच्या बक्षीस रक्कमेतून भारतीय संघातील खेळाडूला प्रत्येकी 5 कोटी रुपये आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्याला प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *