दिल्ली, 04 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात झिका विषाणूची लागण झालेले काही रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी देशातील सर्व राज्यांना झिका विषाणूबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये देशातील झिका विषाणूच्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तसेच यामध्ये झिका विषाणूच्या संसर्गासाठी गर्भवती महिलांची तपासणी करून आणि झिका पॉझिटिव्ह आलेल्या गर्भवती मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवून राज्यांनी सतत जागरुकता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
https://x.com/PIB_India/status/1808446332652413421?s=19
गर्भवती मातांची विशेष काळजी घ्यावी
झिका हा बाधित गर्भवती महिलेच्या गर्भातील मायक्रोसेफली आणि न्यूरोलॉजिकल परिणामांशी संबंधित असल्याने, सर्व राज्यांनी डॉक्टरांना सतर्कतेचे आदेश द्यावेत, अशा सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत. झिका विषाणूच्या संसर्गाची तपासणी करणाऱ्या गर्भवती मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी बाधित भागातील आरोग्य सुविधा किंवा संस्थांना निर्देशित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच राज्यांनी यासंदर्भात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नोडल ऑफिसरची नियुक्ती करावी
राज्यांनी आरोग्य सुविधा किंवा रुग्णालयांना एडिस डासांपासून मुक्त ठेवण्यासाठी निरीक्षण आणि कारवाई करणाऱ्या नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याचे आदेश यामध्ये देण्यात आले आहेत. तसेच राज्यातील निवासी क्षेत्रे, कामाची ठिकाणे, शाळा, बांधकाम स्थळे, संस्था आणि आरोग्य सुविधांमध्ये कीटकशास्त्रीय देखरेख बळकट करण्याच्या राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात झिकाचे 8 रुग्ण आढळले
दरम्यान, महाराष्ट्रात 2 जुलैपर्यंत झिकाची आठ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी पुण्यातील 6, कोल्हापूर आणि संगमनेरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, दिल्लीतील नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च प्रयोगशाळांमध्ये झिका चाचणी सुविधा उपलब्ध आहेत. तत्पूर्वी, 2016 मध्ये भारतातील गुजरातमध्ये सर्वप्रथम झिकाच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली होती. तेव्हापासून तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि कर्नाटक या इतर अनेक राज्यांमध्ये झिकाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.