दिल्ली, 04 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर विश्वविजेत्या भारतीय संघाचे आज मायदेशात आगमन झाले आहे. भारतीय संघ आज सकाळी दिल्ली विमानतळावर दाखल झाला. त्यावेळी टीम इंडियाच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. यावेळी चाहत्यांनी भारतीय संघाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. चाहत्यांचा उत्साह आणि क्रिकेट चाहत्यांची गर्दी पाहता, दिल्ली पोलिसांनी विमानतळावर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यानंतर भारतीय दिल्लीतील संघ हॉटेलकडे रवाना झाला. भारतीय संघ आज ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहे. तेथे त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
https://x.com/ANI/status/1808668030060163161?s=19
चक्रीवादळामुळे मायदेशात येण्यास विलंब
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाने 29 जून रोजी आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. त्यानंतर चक्रीवादळाच्या प्रभावामुळे भारतीय संघ पुढील काही दिवस बार्बाडोसमध्ये अडकला होता. चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर भारतीय संघाने बार्बाडोसच्या ग्रँटली ॲडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी एअर इंडियाच्या विशेष विमानातून मायदेशात येण्यासाठी प्रवास सुरू केला. आज सकाळी हे विमान दिल्ली विमानतळावर दाखल झाले.
https://x.com/JayShah/status/1808464394520760474?s=19
टीम इंडियाचा आज मुंबईत रोड शो
मायदेशात आगमन झाल्यानंतर विश्वविजेता भारतीय संघ सकाळी 11 वाजता पंतप्रधानांची भेट घेणार आहे. यानंतर भारतीय संघ विशेष विमानाने मुंबईला रवाना होईल. दरम्यान, 17 वर्षानंतर भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकला आहे. या कामगिरीबद्दल भारतीय संघाचा आज मुंबईत ओपन टॉप बसमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला आहे. हा रोड शो नरिमन पॉइंट ते मुंबईतील वानखेडे स्टेडियमपर्यंत असणार आहे. त्यानंतर बीसीसीआयकडून वानखेडे स्टेडियमर खेळाडूंचा सन्मान केला जाईल. भारतीय संघाला वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयने जाहीर केलेली 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कमही दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाच्या या रोड शोसाठी मुंबई पोलिसांकडून चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या रोड शो साठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.