माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून कोणीही पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई, मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई, 03 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी आलेल्या महिलांना बुलढाण्याच्या तलाठ्यांनी अरेरावी केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून याप्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना सूचना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात एकनाथ शिंदे आज माध्यमांशी बोलत होते.

https://x.com/CMOMaharashtra/status/1808458937496412217?s=19

महिलांना कसलीही अडचण होऊ नये

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना मोठ्या आत्मीयतेने आणली आहे. त्यामुळे योजनेचा लाभ प्रत्यक्ष महिलांना मिळाला पाहिजे. तसेच महिलांची गैरसोय होऊ नये. त्यांची अडचण होऊ नये. या योजनेसाठी महिलांकडून कोणीही पैशांची मागणी करू नये. याची खबरदारी घ्यावी. अशा प्रकारचे सक्त आदेश जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. तसेच यामध्ये कोणीही लापरवाही केली तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे सांगितले आहे.

योजनेच्या अटींमध्ये शिथिलता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी आणि अर्ज करणे यांसारख्या विविध कामांसाठी शासकीय कार्यालयांत गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर, सदर योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेसंदर्भात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला विविध अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने या योजनेच्या काही अटी शिथिल केल्या. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना राज्य सरकारच्या माध्यमातून महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *