मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

पुणे, 03 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी विविध अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही राज्य सरकारची महत्वाची योजना असून, या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना मिळावा यासाठी योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी मोहिमस्तरावर कार्यवाही करावी, असे निर्देश यावेळी सुहास दिवसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

https://x.com/Info_Pune/status/1808359585297977402?s=19

योजनेला मुदतवाढ!

दरम्यान, माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यास 1 जुलैपासून सुरूवात झाली आहे. तसेच या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 2 महिन्यांनी वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानूसार, या योजनेसाठी महिलांना दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. यामध्ये दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि. 01 जुलै 2024 पासून दर महिन्याला 1,500 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

योजनेच्या अटींमध्ये बदल

याशिवाय, राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटींमध्ये अनेक बदल केले आहेत. त्यानुसार, या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर, त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षांच्याऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आला आहे.

परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरूषाबरोबर विवाह केला असेल तर, अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.

अडीच लाख रुपयांचा उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर, ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे.

सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *