मुंबई, 02 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक केलेल्या 5 आरोपींच्या विरोधात नवी मुंबई पोलिसांनी आज आरोपपत्र दाखल केले आहे. हे सर्व आरोपी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील आहेत. याप्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. हे आरोपी सलमान खानवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानातून शस्त्र खरेदी करण्याच्या तयारीत होते. या आरोपींनी पाकिस्तान मधून एके-47 रायफल, एके-92 रायफल आणि एम-16 रायफल खरेदी करण्याचा कट रचला होता. याशिवाय त्यांना झिगाना पिस्तूलही खरेदी करायचे होते. धक्कादायक बाब म्हणजे, झिगाना पिस्तूलाने पंजाबी गायक सिद्धू मूसवालाची हत्या करण्यात आली होती. तसेच सलमानला मारण्यासाठी लॉरेन्स बिष्णोई टोळीने 25 लाख रुपयांची सुपारी दिली होती. अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे.
https://x.com/ANI/status/1807968757463036231?s=19
अडीच महिन्यांपूर्वी झाला होता गोळीबार
दरम्यान, अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट या घरावर 14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. या घटनेनंतर सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान, सलमानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानच्या घरी जाऊन सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांची भेट घेतली होती. या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करण्यात येईल, असे त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते.
लॉरेन्स बिष्णोई टोळीने केला होता हल्ला
त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिष्णोई टोळीतील दोन्ही हल्लेखोरांना हल्ल्याच्या अवघ्या दोन दिवसांनी गुजरातमधून अटक केली होती. तसेच 24 एप्रिल रोजी या प्रकरणात आणखी 2 जणांना अटक करण्यात आली होती. तर पाचव्या आरोपीला पोलिसांनी 3 जून रोजी ताब्यात घेतले होते. याप्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल आणि गोल्डी ब्रार यांच्यासह एकूण 18 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेच्या दिवशी लॉरेन्सचा भाऊ अनमोल याने सोशल मीडियावर या गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी घेतली होती.