राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन योजना सुरू करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई, 29 जून: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घेता यावे, यासाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भातील घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली आहे. या योजनेसाठी प्रशासनाकडून येत्या काळात धोरण आणि नियमावली तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना लागू करण्यात यावी, अशी विनंती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती.

ज्येष्ठांना तीर्थस्थळांचे दर्शन घेता येणार

त्यानुसार, प्रताप सरनाईक यांनी या योजनेचा प्रस्ताव आज विधानसभेत मांडला. या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. काही जेष्ठ नागरिकांना त्यांची इच्छा असून देखील परिस्थितीमुळे तीर्थस्थळांची यात्रा करता येत नाही. तसेच त्यांना आर्थिक अडचणींमुळे तीर्थक्षेत्राला जाणे शक्य होत नाही, अशा जेष्ठ नागरिकांसाठी ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेसाठी लवकरच धोरण आणि नियमावली करण्यात येईल. त्यानंतर ही योजना राज्यात लागू होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या योजनेअंतर्गत हिंदू, मुस्लीम, ख्रिचन, बौद्ध, जैन, शीख धर्मियांच्या महत्त्वाच्या तीर्थस्थळांचा समावेश असणार आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *