राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू

मुंबई, 27 जून: (विश्वजीत खाटमोडे) राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून (दि.27) सुरू होणार आहे. हे अधिवेशन 27 जून ते 12 जुलै या कालावधीत मुंबई येथे पार पडणार आहे. यावेळी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये 28 जून रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज 13 दिवस चालणार आहे. तसेच शनिवारी 29 जून रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे.

https://x.com/VijayWadettiwar/status/1805975793253920789?s=19

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

तत्पूर्वी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. हे सरकार शेतकरीविरोधी असून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी केंद्रात आवाज उठवत नसल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बुधवारी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्यात आल्याची घोषणा केली.

विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

राज्यातील शेतकरी हा दुष्काळ, पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती, वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे अडचणीत आला आहे. महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याबरोबरच संपूर्ण वीजबील माफी करावी, अशी मागणी आम्ही वारंवार केली. तरी देखील संवेदना गमावलेल्या सरकारने केवळ घोषणाबाजी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. असे विजय वडेट्टीवार यांनी यावेळी म्हटले. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या सत्ताधाऱ्यांच्या चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला आहे. जनतेचा विश्वास गमावलेल्या सरकारचा चहा घेणे हा लोकशाहीचा तसेच महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी म्हटले.

या मुद्द्यांवरून अधिवेशन गाजणार?

दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी कर्जमाफी, बोगस बियाणे, पीक कर्ज, पेपरफुटी तसेच परीक्षेतील गैरप्रकार, बेरोजगारी, आरक्षण, अमली पदार्थांचा वाढता विळखा, राज्यातील कायदा व सुव्यवस्था, यांसारख्या अनेक मुद्द्यांवरून हे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. तर राज्य सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून ह्या अधिवेशनात महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *