टी-20 वर्ल्डकप: अफगाणिस्तानची सेमी फायनलमध्ये एंट्री, ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर!

सेंट व्हिन्सेंट, 25 जून: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना झाला. सेंट व्हिन्सेंटच्या अर्नोस वेल मैदानावर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला. या विजयासह अफगाणिस्तानचा संघ प्रथमच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. तत्पूर्वी, काल रात्री झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे आता बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचे 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

https://x.com/ICC/status/1805479754860315088?s=19

https://x.com/ICC/status/1805472357433192539?s=19

अफगाणिस्तानची भेदक गोलंदाजी!

या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने बांगलादेश समोर 116 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्याचवेळी हा सामना पावसामुळे अनेकदा थांबवण्यात आला. त्यामुळे बांगलादेशला 19 षटकांत 114 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. मात्र, बांगलादेशचा संपूर्ण संघ 17.5 षटकांत 105 धावांत बाद झाला. अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हल हा या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने बांगलादेशला विजयासाठी 9 धावा आवश्यक असताना सलग दोन विकेट्स घेतल्या. त्यामुळे अफगाणिस्तानने हा सामना 8 धावांनी जिंकला. या सामन्यात अफगाणिस्तान कडून नवीन उल हल आणि कर्णधार राशिद खानने प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. तर फजलहक फारुकी आणि गुलबदिन नायब यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

https://x.com/ICC/status/1805464116976369889?s=19

लिटन दासचे अर्धशतक व्यर्थ!

या सामन्यात बांगलादेशकडून लिटन दास याने 49 चेंडूत नाबाद 54 धावांची खेळी केली. परंतू त्याचवेळी बांगलादेशच्या दुसऱ्या बाजूने सातत्याने विकेट पडत गेल्या. बांगलादेश संघातील दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाने लिटन दासला साथ दिली नाही. त्यामुळे त्यांना आज पराभवाचा सामना करावा लागला. तत्पूर्वी, या सामन्यात अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 115 धावा केल्या. यामध्ये अफगाणिस्तान कडून रहमानुल्ला गुरबाजने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. तसेच इब्राहिम झद्रानने 18 धावा, अजमतुल्ला उमरझाईने 10 धावा आणि राशिद खानने नाबाद 19 धावा केल्या. बांगलादेशकडून रिशाद हुसेन याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर मुस्तफिजुर रहमान आणि तस्किन अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

https://x.com/ICC/status/1805473509927158034?s=19

https://x.com/ICC/status/1805306674653315231?s=19

सेमी फायनलचे चित्र स्पष्ट!

या विजयासह अफगाणिस्तानने टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्याचबरोबर सुपर 8 च्या ग्रुप 1 मधून ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या संघांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. आता उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. हा सामना 27 जून रोजी सकाळी 6 वाजता खेळविण्यात येणार आहे. तर उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. हा सामना 27 जून रोजी रात्री 8 वाजता सुरू होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *