टी-20 वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर; अफगाणिस्तान संघाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय!

किंग्सटाऊन, 23 जून: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानच्या संघाने आज ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत आज अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज किंग्सटाऊन येथील अर्नोस वेल मैदानावर सामना खेळविण्यात आला. या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केला आहे. विशेष म्हणजे, अफगाणिस्तानच्या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीच्या दृष्टीने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उद्याच्या सामन्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

https://x.com/ICC/status/1804727318503473345?s=19

अफगाणिस्तानचे 149 धावांचे लक्ष्य

तत्पूर्वी, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. त्यानंतर अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या. या सामन्यात अफगाणिस्तान संघाकडून रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी पहिल्या विकेटसाठी 95 चेंडूत 118 धावांची भागीदारी केली. त्यावेळी 15.5 व्या षटकात गुरबाज 49 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 60 धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यावर इब्राहिम झद्रान देखील 48 चेंडूंत 51 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर अफगाणिस्तानला 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा करता आल्या.

https://x.com/ICC/status/1804700398323700073?s=19

पॅट कमिन्सची पुन्हा हॅटट्रिक!

तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने इतिहास रचला. त्याने सलग दुसऱ्या सामन्यात हॅटट्रिक घेतली. याआधी कमिन्सने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती. टी-20 विश्वचषकात दोन हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 3, ॲडम झॅम्पा 2 आणि मार्कस स्टॉयनिस याने एक विकेट घेतली.

ऑस्ट्रेलिया 127 धावांत ऑल आऊट

प्रत्युत्तरात 149 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात अत्यंत खराब झाली. त्यांचे 3 फलंदाज 5.2 षटकांत संघाची 32 धावसंख्या असताना बाद झाले. यामध्ये ट्रॅव्हिस हेड (0), डेव्हिड वॉर्नर (3), कर्णधार मिचेल मार्श (12) ह्या तीन फलंदाजांचा समावेश होता. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉयनिस यांनी डाव सावरण्याचा थोडा प्रयत्न केला. परंतु, स्टॉयनिस 11 धावा करून बाद झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल या एकमेव फलंदाजाने 41 चेंडूत 59 धावांची खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या इतर कोणत्याही फलंदाजाला अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 19.2 षटकांत 127 धावांवर बाद झाला. अफगाणिस्तानच्या या विजयाचा शिल्पकार गुलबदिन नायब ठरला. याने ऑस्ट्रेलियाच्या 4 फलंदाजांना बाद केले. त्याचबरोबर नवीन उल हक 3, ओमरझाई, मोहम्मद नबी आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सेमी फायनलचा मार्ग खडतर!

दरम्यान, आजच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याचा मार्ग खडतर झाला आहे. सुपर 8 च्या गट-1 मध्ये भारत 4 गुण मिळवून पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया 2 गुणांसह दुसऱ्या, अफगाणिस्तान 2 गुण मिळवून तिसऱ्या आणि बांगलादेश चौथ्या क्रमांकावर आहे. उपांत्य फेरी प्रवेश मिळवण्यासाठी आता ऑस्ट्रेलियाला आपला शेवटचा सामना भारतासोबत खेळायचा आहे. तर अफगाणिस्तानचा शेवटचा सामना बांगलादेश विरुद्ध होणार आहे. या दोन्ही सामन्यावरच उपांत्य फेरीतील त्यांच्या प्रवेशाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *