सीईटी परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, 22 जून: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील एमएचटी-सीईटी 2024 परीक्षा संदर्भात गोंधळाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन सीईटी परीक्षेतील कथित गोंधळामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली. या संदर्भातील सूचना राज्यपालांनी सीईटी सेलला द्याव्यात, अशी मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

https://x.com/AUThackeray/status/1804465549620998212?s=19

आदित्य ठाकरेंच्या या मागण्या

सीईटी परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका खुल्या करायला हव्यात. फक्त पर्सेंटाईल नव्हे, तर विद्यार्थ्यांचे गुण जाहीर करायला हवेत. पेपरमधील 54 चुकांसाठी पेपर सेट करणाऱ्यांना जबाबदार धरायला हवे. ज्यांनी 1425 आक्षेप घेतले आहेत, त्यांना पूर्ण परतावा मिळायला हवा. यांसारख्या मागण्या आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केल्या आहेत. त्यामुळे राज्यपाल या संदर्भात कोणती भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली, सीईटी सेलचे स्पष्टीकरण

दरम्यान, महाराष्ट्रात राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून घेण्यात आलेली एमएचटी-सीईटी 2024 ही परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिले आहे. या परीक्षेत सर्व सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, यासाठी बॅचप्रमाणे पर्सेंटाईल पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येतो. ही परीक्षा पद्धत वर्ष 2018-19 पासून सुरू आहे. तसेच तांत्रिक बाबींच्या पूर्ततेनंतर विद्यार्थ्यांना या परीक्षेची उत्तरपत्रिका सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाईटवर येत्या 27 आणि 28 जून रोजी पाहता येईल, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सांगण्यात आले आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अभियांत्रिकी औषधनिर्माणशास्त्र, कृषी शिक्षण या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आली होती. राज्यातील एकूण 6 लाख 75 हजार 377 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *