राज्याच्या प्रमुखांनी उपोषणकर्त्यांची भेट घ्यावी, पंकजा मुंडे यांची मागणी

बीड, 21 जून: (विश्वजीत खाटमोडे) ओबीसी आरक्षण संदर्भातील विविध मागण्यांसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे सध्या आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची उपोषणस्थळी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट केले आहे. शिष्टमंडळाने उपोषणस्थळाला भेट दिली असली तरी, राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

https://x.com/Pankajamunde/status/1804033353143779472?s=19

पंकजा मुंडे यांचे ट्विट

“राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करून किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी. या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत. शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल, अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे,” असे पंकजा मुंडे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

https://x.com/girishdmahajan/status/1804039972867182697?s=19

उपोषण मागे घेण्याची विनंती

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह वडीगोद्री येथे जाऊन लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने वडीगोद्री येथे जाऊन उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली होती. ओबीसी आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागणार नाही, ही सरकारची भूमिका असून या भूमिकेत कधीही बदल होणार नाही. राज्य सरकारच्या या भूमिकेवर विश्वास ठेवून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी त्यांचे उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती यावेळी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *