श्रीनगर, 21 जून: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज (21 जून) जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम आज सकाळी 6.40 वाजता श्रीनगरमधील दल सरोवराच्या काठावरील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु, पावसामुळे या योग दिनाच्या कार्यक्रमात व्यत्यय आला. त्यामुळे हा कार्यक्रम नगरच्या एसकेआयसीसीच्या सभागृहात पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील नागरिकांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अनेक योगासने केली. योग केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी काश्मिरी महिलांसोबत सेल्फी देखील काढला. त्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेयर केले आहेत.
https://x.com/narendramodi/status/1803996122999853182?s=19
https://x.com/AHindinews/status/1803983946960769454?s=19
https://x.com/PIB_India/status/1804023231948689617?s=19
योगाबद्दलची जागरुकता वाढलीय
लोकांमध्ये योगाबद्दल जागरुकता वाढली आहे. जागतिक नेते आता योगाबद्दल बोलत आहेत. आता योगावर संशोधन होत आहे. योग पर्यटनाचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. जम्मू आणि काश्मीर हे योगसाधनेची भूमी आहे. ऋषिकेश आणि काशीपासून केरळपर्यंत, भारतात योग पर्यटनाचा एक नवीन ट्रेंड उदयास येत आहे. जगभरातून लोक अस्सल योग शिकण्यासाठी भारतात येत आहेत. आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्रात योगाशी संबंधित समर्पित सुविधा विकसित केल्या जात आहेत. दहा वर्षांपूर्वी मी संयुक्त राष्ट्र संघात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. भारताच्या प्रस्तावाला 177 देशांनी पाठिंबा दिला, हा एक विक्रम असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
योग दिनाची सुरूवात कशी झाली?
दरम्यान योगाचे हे महत्त्व लक्षात घेऊन, दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरूवात 2015 मध्ये झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 69 व्या अधिवेशनातील आपल्या भाषणात योग दिनाची कल्पना मांडली होती. त्यानंतर 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राच्या सर्व सदस्य देशांनी दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यास एकमताने सहमती दिली होती. तेंव्हापासून 21 जून हा जागतिक योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.