सुनेत्रा पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड! झाली अधिकृत घोषणा

मुंबई, 19 जून: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा खासदारपदी बिनविरोध निवड झाली आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा महाराष्ट्र विधिमंडळाच्या सचिवालयाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगळवारी केली आहे. राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेची जागा रिक्त होती. त्या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, यामध्ये सुनेत्रा पवार यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची आता राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

https://x.com/mahancpspeaks/status/1803068901997031641?s=19

लोकसभा निवडणुकीत पराभव

तत्पूर्वी, नुकत्याच पार पडलेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा 1 लाख 58 हजार 333 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून 13 जून रोजी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ उपस्थित होते.

बारामतीत तीन खासदार!

सुनेत्रा पवार यांची आता राज्यसभा खासदारपदी निवड झाल्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणती जबाबदारी मिळते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या रुपाने बारामतीला तिसरा खासदार मिळाला आहे. यापूर्वी शरद पवार यांच्याकडे राज्यसभेची खासदारकी आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून विजय मिळवल्याने त्या देखील लोकसभा खासदार आहेत. याशिवाय, अजित पवार यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री पद आहे. त्यामुळे येत्या काळात बारामतीची ताकद आणखी वाढणार, यात काही शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *