वसईत भर दिवसा भीषण हत्या, डोक्यात लोखंडी पाना घालून तरूणीचा निर्घृण खून

वसई, 18 जून: (विश्वजीत खाटमोडे) वसईमध्ये सर्वांना हादरून टाकणारी एक खळबळजनक घटना घडली आहे. वसईत एका तरूणाने भर रस्त्यात 20 वर्षीय तरूणीची डोक्यात लोखंडी पाना घालून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना आज सकाळी घडली. दरम्यान, ही तरूणी रस्त्यावरून जात असताना या तरूणाने अचानकपणे पाठीमागून येऊन तिच्या डोक्यात लोखंडी पान्याने जोरदार वार केला. त्यानंतर हा तरूण थांबला नाही, त्याने या तरूणीच्या डोक्यात लोखंडी पान्याने एकामागून एक अनेक वार केले. या घटनेत पीडित तरूणीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी या आरोपी तरूणाला अटक केली आहे. रोहित यादव (29) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे सर्वच जण हादरून गेले आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, नुकतेच ब्रेकअप झाल्यानंतर या तरूणाने हे कृत्य केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, या हत्येचे खरे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, हे दोघेही जवळपास 2 वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते, तसेच नुकताच त्यांचा ब्रेकअप झाल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, या आरोपीने पीडित तरूणीवर हल्ला केला, तेव्हा रस्त्यावर अनेक लोक उपस्थित होते. मात्र, या तरूणीच्या मदतीसाठी कोणीही धावून आले नाही.

अनेकजण या घटनेचा व्हिडिओ शूट करताना दिसत होते. तर काही जण ही घटना पाहून लांब जात होते. त्यावेळी या आरोपीला हत्या करण्यापासून रोखण्याची हिम्मत उपस्थित लोकांची झाली नाही. ही घटना घडत असताना काही वेळानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने या आरोपीला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. तोपर्यंत बराच उशीर झाला होता. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या घटनेचा सध्या पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *