T20 वर्ल्डकप; सुपर 8 फेरीचे वेळापत्रक जाहीर, या दिवशी भारताचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी सामना होणार

बार्बाडोस, 17 जून: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे साखळी फेरीतील काहीच सामने शिल्लक राहिले आहेत. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत एकूण 20 संघांनी सहभाग घेतला होता. त्यातील आठ संघ या स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत दाखल झाले आहेत. यामध्ये भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश आठ संघ सुपर 8 फेरीसाठी पात्र ठरले आहेत. यामधील भारत आणि अमेरिका हे संघ ग्रुप ए मधून, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे ग्रुप बी मधून, तर अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज हे ग्रुप सी मधून आणि दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे संघ ग्रुप डी मधून सुपर 8 मध्ये पोहोचले आहेत.

https://x.com/ICC/status/1802544438935167035

19 जूनपासून सुपर 8 फेरीचे सामने

आता T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतील सामन्यांना 19 जूनपासून सुरूवात होणार आहे. या सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे. या स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत दोन ग्रुप असणार आहेत. यातील ग्रुप 1 मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे चार संघ असणार आहे. तर ग्रुप 2 मध्ये वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अमेरिका हे संघ असतील. सुपर 8 फेरीत एका संघाचे प्रत्येकी 3 सामने होतील. त्यामधून दोन्ही गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

https://twitter.com/ICC/status/1802574363369103458?s=19

भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ सुपर 8 फेरीच्या ग्रुप 1 मध्ये आहे. या ग्रुपमध्ये भारताचा पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध खेळविण्यात येणार आहे. भारताचा दुसरा सामना 22 जून रोजी बांगलादेश विरुद्ध, तर तिसरा सामना 24 जून रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. टीम इंडियाचे हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होणार आहेत. तत्पूर्वी, गेल्या वर्षी पार पडलेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारूण पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्याची संधी भारतीय संघाला असणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *