राज्यातील विकासकामे गतीने पूर्ण करण्याचे अजित पवारांचे निर्देश

मुंबई, 13 जून: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी राज्यात सुरू असलेली तसेच प्रगतीपथावर असलेली प्रस्तावित विकासकामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने पूर्ण करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. महाराष्ट्राचा दीर्घकालीन विकास डोळ्यासमोर ठेऊन राज्यभरात सध्या विविध विभागांमार्फत विकासकामे सुरू आहेत. नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील या सर्व विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा अजित पवार यांनी यावेळी सदर बैठकीतून घेतला.

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1801191384541540396?s=19

या प्रकल्पांचा आढावा घेतला

अजित पवार यांनी या बैठकीत राज्यातील अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वडाळा येथील जीएसटी भवन, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे, सारथी संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील सारथीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, पुणे येथील कृषीभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणीभवन आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

विकासकामांना गती द्या…

तसेच या बैठकीत पुणे शहरातील मेट्रो क्रमांक 3 च्या कामाला वेग द्या. नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे रिंग रोडचे काम वेगाने मार्गी लावा. या कामासाठी आवश्यक असणारा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली. सोबतच कोकणाच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या रेवस ते रेडी या किनारा महामार्गाला वेग देण्यासाठी प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा. तसेच सातारा येथे उभारण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देतानाच सातारा सैनिक स्कुलचे काम देखील सुद्धा तातडीने मार्गी लावा, अशा सूचना देखील त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *