दहशतवाद्यांच्या गोळीबारात 9 जण ठार, उप राज्यपालांनी घेतली जखमींची भेट

रियासी, 10 जून: (विश्वजीत खाटमोडे) जम्मू-काश्मीरमधील तीर्थक्षेत्रातून यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात नऊ जण ठार झाले. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. या हल्ल्यानंतर बस खड्ड्यात कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस शिव खोडी मंदिरातून परतत होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी रियासी येथे या बसवर गोळीबार केला. या हल्ल्यात 9 जण ठार, तर 33 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्याचा देशभरातून तीव्र निषेध केला जात आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1800070891906490653?s=19

हल्ल्यानंतर बस दरीत कोसळली

तत्पूर्वी या हल्ल्याची माहिती मिळताच, स्थानिक लोक, पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांनी या ठिकाणी बचावकार्य सुरू करून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. हे भाविक शिव खोडी मंदिरातून परतत असताना रियासी येथे त्यांच्या बसवर दहशतवाद्यांनी अचानकपणे गोळीबार केला. यावेळी दहशतवाद्यांनी 30 ते 40 राऊंड गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी एक गोळी बस चालकाला लागली, त्यामुळे बस 200 फूट खोल दरीत कोसळली. तर हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा सध्या शोध घेतला जात आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1800045847021068656?s=19

प्रत्यक्षदर्शी व्यक्तीची प्रतिक्रिया

दरम्यान, दहशतवादी हल्ल्यात वाचलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, “माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्यानंतर मी शिव खोडी येथे गेलो होतो. तेथून परतत असताना चार ते पाच किलोमीटरनंतर आमच्या बसवर गोळीबार करण्यात आला. आमची बस खड्ड्यात पडल्यानंतरही गोळीबार सुरूच होता. ड्रायव्हरला गोळी लागली आणि नंतर गोळीबारात काही लोक जखमीही झाले.”

https://twitter.com/AHindinews/status/1800070917042892867?s=19

मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत

तर जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज जम्मूतील सरकारी रुग्णालयात रियासी दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट घेतली. त्यानंतर मनोज सिन्हा म्हणाले, “बस चालकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, त्यानंतर बस खड्ड्यात पडली. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे आणि सुमारे 33 लोक जखमी झाले आहेत. बचाव कार्य कालपासून सुरू आहे. तसेच पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराने शोध मोहीम सुरू केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल. जखमींना वाचवणे हे आमचे प्राधान्य आहे.” दरम्यान रियासी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या यात्रेकरूंच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. जखमी यात्रेकरूंवर जम्मू आणि रियासी येथील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपाल कार्यालयाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *