कंगना राणावत हिला थप्पड मारली! चंडीगड विमानतळ येथील घटना

चंडीगड, 06 जून: (विश्वजीत खाटमोडे) बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत संदर्भात एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सीआयएसएफच्या एका महिला कर्मचाऱ्याने कंगना राणावतला कानाखाली मारली असल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना चंदीगड विमानतळावर घडली. कंगना राणावत आज चंदीगड हून दिल्लीला चालली होती. त्यावेळी हा प्रकार घडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कंगना राणावत हिने भाजपच्या तिकिटावर हिमाचल प्रदेशातील मंडी येथून विजय मिळवला होता.

https://twitter.com/ANI/status/1798696059956559974?s=19

कानाखाली का मारली?

कुलविंदर कौर असे कंगनाला थप्पड मारणाऱ्या सीआयएसएफ महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, कंगना राणावत ही यापूर्वी अनेकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेली आहे. कंगनाच्या जुन्या वक्तव्यामुळे सीआयएसएफची महिला कर्मचारी संतापलेली होती. त्यामुळे तिने कंगना राणावत हिला कानाखाली मारली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र याविषयी अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेनंतर संबंधित महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेच्या पुढील तपासासाठी सीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तर चंदीगड विमानतळावर सीआयएसएफ कडून सध्या सीसीटीव्ही तपासले जात आहे.

या घटनेमुळे सर्वत्र खळबळ

तत्पूर्वी कंगना राणावत आज दुपारच्या सुमारास दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर पोहोचली. यावेळी तपासणीदरम्यान सीआयएसएफ महिला कर्मचारी कुलविंदर कौर हिने कंगनाच्या कानाखाली मारली. त्यानंतर त्यांच्यात मोठी बाचाबाची झाली. याप्रकरणी कंगनात राणावत हिने संबंधित सीआयएसएफ महिला कर्मचाऱ्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, कंगना राणावत हिने अलीकडेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील मंडी येथे काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांचा पराभव केला होता. मात्र, तिच्याबाबत घडलेल्या या घटनेची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *