राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा खोट्या, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया

मुंबई, 06 जून: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, रामराजे नाईक निंबाळकर, धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे, आदिती तटकरे यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात आढावा घेण्यात आला असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे काही आमदार शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चा खोट्या असल्याचे म्हटले आहे.

https://twitter.com/mahancpspeaks/status/1798660175546704221?s=19

निवडणुकीचा आढावा घेण्यात आला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व आमदारांची आज संध्याकाळी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील सर्व मतदारसंघातील निकालावर चर्चा केली जाणार आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर भर देत महायुतीसोबत आक्रमकपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी आणि एनडीएला अपेक्षित यश मिळू शकले नाही, या संदर्भात ह्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आजच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

आम्ही सर्व एकसंघ आहोत

दरम्यान, राष्ट्रवादीचे काही आमदार शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चांना सुनील तटकरे यांनी यावेळी उत्तर दिले आहे. आमचे आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे. तसेच आमचे सर्व आमदार आमच्यासोबत आहेत आणि आम्ही एक संघ आहोत. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचा अजित पवार यांच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास आहे. तर अशा अफवा आणि बनावट व्हिडिओ निवडणुकीच्या काळातही पसरवले जात होते, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *