अमरावतीत नवनीत राणा यांचा पराभव! काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी

अमरावती, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांनी 19 हजार 731 मतांनी विजय मिळवला आहे. दरम्यान, मतमोजणी सुरू झाल्यापासूनच कधी बळवंत वानखेडे आघाडी घेत होते, तर कधी नवनीत राणा या पुढे जात होत्या. मात्र, या चुरशीच्या लढतीत नवनीत राणा यांना प्रभावाचा सामना करावा लागला आहे. तत्पूर्वी, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली होती.

https://twitter.com/ddsahyadrinews/status/1798009814787993921?s=19

किती मतदान झाले?

या निवडणुकीत बळवंत वानखेडे यांना 5 लाख 24 हजार 136 मते मिळाली. यामध्ये त्यांना 2 हजार 135 पोस्टल मते पडली. बळवंत वानखेडे यांना इतर उमेदवारांच्या तुलनेत 44.84 टक्के मतदान झाले आहे. तर नवनीत राणा यांना या निवडणुकीत 43.16 टक्के मतदान झाले. यावेळी नवनीत राणा यांना 5 लाख 04 हजार 806 इतकी मते मिळाली आहेत. सोबतच त्यांना पोस्टलचे 1 हजार 734 मतदान झाले होते. तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बूब यांना एकूण 85 हजार 300 इतकी मते पडली.

अमरावतीत तिरंगी लढत

या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात तिरंगी लढत झाली. यामध्ये भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसकडून बलवंत वानखेडे आणि प्रहारकडून दिनेश बुब यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान, नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला जाहीरपणे विरोध केला होता. त्यावेळी महायुतीच्या नेत्यांनी बच्चू कडू यांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्यांना यामध्ये यश आले नाही. त्यानंतर बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना विरोध करण्यासाठी प्रहारकडून दिनेश बुब यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. हेच नवनीत राणा यांच्या पराभवाचे प्रमुख कारण मानले जात आहे. दरम्यान, लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवणीत राणा यांनी त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, नवनीत राणा यांच्या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *