लोकसभा निवडणूक; शरद पवारांनी मानले जनतेचे आभार!

मुंबई, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीत राज्यातील 48 जागांपैकी महाविकास आघाडी सध्या 28 जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी महायुती 18 जागांवर आघाडीवर आहे तर एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज एक निवेदन प्रसिद्ध करून जनतेचे आभार मानले आहेत. “लोकसभा निवडणूकांचे सर्व निकाल अद्याप हाती आले नसले तरी महाराष्ट्राने परिवर्तनाच्या दिशेने निकाल घेतल्याचे स्पष्ट होते,” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/NCPspeaks/status/1797924393995420083?s=19

जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त करतो

“भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार ह्या महाराष्ट्र विकास आघाडीतील घटकांनी सामूहिकरित्या जनतेपुढे आपली भुमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून शाहू – फुले – आंबेडकरांचा पुरोगामी विचार पुढे नेणे, लोकशाही मुल्यांचे रक्षण करणे ही ती प्रमुख भुमिका होती. जाती-धर्माच्या वादापलीकडे जाऊन रोजगार, महागाई यांसारख्या दैनंदिन भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आघाडी कटीबद्ध होती. ह्या भुमिकेचे जनतेने स्वागत केले, सन्मान राखला आणि महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला याबद्दल मी महाराष्ट्रातील तमाम जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, असे शरद पवार म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार

“राहूल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र विकास आघाडी आपली भुमिका तळागळातील जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करेल आणि शेवटच्या घटकाच्या हिताची जपणूक करण्यासाठी आम्ही सतत सामूहिक प्रयत्न करू असा शब्द आपणास देतो,” असे ते म्हणाले.

यानिकालाने देशातील चित्र बदलले

“ह्या निवडणूक निकालाने देशातील चित्र देखील बदलले आहे. ह्यात महाराष्ट्राची प्रमुख भुमिका आहे. याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचा मला अभिमान आहे. देश हिताच्या दृष्टीने इंडिया आघाडी काही पावले टाकत असतील तर महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सामूहिक योगदान देण्यात अग्रभागी राहू. अतिशय संघर्षपूर्ण झालेल्या ह्या लोकशाही लढ्यात महाराष्ट्रातील जनतेने कणखर साथ दिली त्याबद्दल जनतेचे मी पुन्हा ऋण व्यक्त करतो. तसेच महाराष्ट्र विकास आघाडीतील असंख्य कार्यकर्त्यांनी हे यश मिळवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद!” असे शरद पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *