पुणे, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आणि त्याचा निकाल आज लागणार आहे. लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांसाठी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली. कारण, भाजपने सुरत लोकसभेची जागा यापूर्वीच बिनविरोध जिंकली आहे. त्यावेळी मतमोजणी कर्मचाऱ्यांनी सर्वप्रथम मतपत्रिकेची मतमोजणी केली आहे. मतपत्रिकेची मतमोजणी करण्याची प्रक्रिया सुमारे एक तास चालणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मधील मतमोजणी करण्यात येईल. तर आज दुपारपर्यंत या निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशात कोणाचे सरकार स्थापन होणार? हे काही तासांतच कळणार आहे.
महायुती की महाविकास आघाडी?
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी 5 टप्प्यात मतदान पार पडले. या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू झाली आहे. महाराष्ट्रात भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात यंदा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची महायुती आणि काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्ष यांची महाविकास आघाडी यांच्यात सामना आहे. त्यामुळे राज्यातील जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली असून, विविध शहरातील अनेक मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आली आहे.
राज्यात 48 जागांवर निवडणूक
तत्पूर्वी, महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी 5 टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान झाले. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या जागांवर मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी अकोला, बुलढाणा, अमरावती, वर्धा, हिंगोली, यवतमाळ-वाशीम, परभणी, नांदेड येथे मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या जागांवर मतदान पार पडले. तसेच चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी नंदुरबार, जळगाव, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या जागांसाठी मतदान झाले. तर पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात 20 मे रोजी धुळे, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर, ठाणे, भिवंडी, कल्याण, नाशिक, पालघर, दिंडोरी येथे मतदान झाले. या सर्व जागांची मतमोजणी सध्या सुरू आहे.