पंढरपूर, 02 जून: (विश्वजीत खाटमोडे) पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी बंद करण्यात आले होते. हे काम आता जवळपास पुर्ण झाल्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन आजपासून सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दिली आहे. त्यामुळे वारकरी तसेच विठ्ठल भक्तांमध्ये सध्या आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे. दरम्यान, पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आल्यानंतर आज श्री.नामदेव पायरी व विठ्ठल मंदिरात आकर्षक व सुंदर अशी फुलांची आरास करण्यात आली आहे.
https://twitter.com/PandharpurVR/status/1797148564579315779?s=19
https://twitter.com/airnews_pune/status/1797119556210639003?s=19
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1791785637009342935?s=19
आजपासून दर्शन सुरू
दरम्यान, मंदिराच्या जतन संवर्धनाच्या कामासाठी 15 मार्च 2024 पासून पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन कधी सुरू होणार? याची वाट भाविक पाहत होते. यासंदर्भात पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर यांनी 18 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन 2 जुनपासून विठुरायाचे दर्शन सुरू होणार असल्याची माहिती दिली होती. तसेच येत्या 7 जुलैपासून आषाढी एकादशीसाठी विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू राहणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले होते.
संवर्धनाचे काम सुरू
पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे काम अतिशय जोमाने सुरू आहे. हे काम अजून 17 ते 18 महिने सुरू राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विठ्ठल मंदिराचे बरेचसे काम पूर्ण सध्या पूर्ण झाले आहे. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन आजपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले झाल्यानंतर देवाच्या सर्व पूजा पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती देखील पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
https://twitter.com/ChDadaPatil/status/1797127065382351057?s=19
https://twitter.com/ChDadaPatil/status/1797162376430801298?s=19
चंद्रकांत पाटलांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन
पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले झाल्यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी विठ्ठल मंदिरात सापडलेल्या पुरातन वस्तूंची पाहणी करून त्याबाबतची माहिती घेतली. दरम्यान काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामादरम्यान हनुमान दरवाजाजवळील तळघरात काही पुरातन मूर्ती तसेच जुनी नाणी सापडली आहेत. त्यांचा सध्या पुरातत्त्व विभागाकडून अभ्यास केला जात आहे.