कालीचरण महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याची दखल महिला आयोगाने घेतली

नाशिक, 01 जून: (विश्वजीत खाटमोडे) कालीचरण महाराज यांनी महिलांच्या संदर्भात अश्लील वक्तव्य केले आहे. त्यामुळे कालीचरण महाराज हे सध्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली आहे. याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना नियमानुसार चौकशी आणि कारवाई करून त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात रुपाली चाकणकर यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे.

https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1796566736273367195?s=19

महिला आयोगाचे निर्देश

नाशिक जिल्ह्यात कालीचरण महाराज यांनी सुखाची व्याख्या समजून सांगताना महिलांबाबत अश्लील भाषेत लज्जा उत्पन्न होईल, असे वक्तव्य केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना प्रसार माध्यमाद्वारे प्रसारीत होत आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. सदर प्रकरण गंभीर स्वरुपाचे असून महिलांना केवळ उपभोग्य वस्तू असे उद्देशल्यामुळे समाज माध्यमांमध्ये प्रतिक्रिया उमटत आहेत. तरी प्रकरणाची योग्य ती नियमानुसार चौकशी करण्यास संबंधित पोलीस स्टेशन यांना योग्य ते आदेश व्हावेत तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला सादर करावा, असे निर्देश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

कालीचरण महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य

काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात कालीचरण महाराजांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात कालीचरण महाराजांनी महिलांबाबत अश्लील वक्तव्य केले. जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या. सर्व भोगून घ्या. चांगल्या फुलांचा वास घ्या. नाकाचा देखील सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद हा कधीही संपणार नाही, असे वादग्रस्त विधान कलीचरण महाराजांनी केले होते. या वक्तव्यामुळे कालीचरण महाराज यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. तसेच याप्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतल्यामुळे आता कालीचरण महाराजांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान कालीचरण महाराज यांनी यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे. तीन वर्षांपूर्वी कालीचरण महाराजांनी महात्मा गांधी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणात त्यांना अटक देखील झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *