रेमल चक्रीवादळ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आर्थिक मदतीची घोषणा

दिल्ली, 01 जून: (विश्वजीत खाटमोडे) रेमल चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम बंगालसह पूर्वेकडील अनेक राज्यांना बसला आहे. या चक्रीवादळामुळे निर्माण झालेली पूरस्थिती आणि अतिवृष्टी यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अनेकजण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेमल चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना तसेच जखमींना आर्थिक मदत जाहीर केली आहे. दरम्यान रेमल चक्रीवादळामुळे जवळपास 38 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

https://twitter.com/PMOIndia/status/1796582139150143733?s=19

https://twitter.com/narendramodi/status/1796506393475940577?s=19

मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत

आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये आलेल्या रेमल चक्रीवादळाच्या नंतर आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे मृत पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत देण्याची घोषणा प्रधानमंत्री कार्यालयाने ट्विट करून केली आहे. ही मदत प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येणार आहे. तसेच रेमल चक्रीवादळानंतर आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधील नैसर्गिक आपत्तींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. “दुर्दैवाने आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये रेमल चक्रीवादळानंतर नैसर्गिक आपत्ती आल्या आहेत. माझे विचार आणि प्रार्थना तिथे प्रभावित झालेल्या सर्वांसोबत आहेत. प्रचलित परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्र सरकारने राज्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. बाधितांना मदत करण्यासाठी अधिकारी काम करत आहेत,” असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

अनेकांचा मृत्यू

रेमल चक्रीवादळामुळे ईशान्येकडील आठही राज्यांतील रस्ते आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाले आहेत. तसेच जोरदार वाऱ्यासह पावसामुळे भूस्खलन झाले, झाडे उन्मळून पडली आणि विद्युत खांब आणि वीज आणि इंटरनेट सेवा विस्कळीत झाली. रेमल चक्रीवादळानंतर आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे मिझोराममध्ये 29 लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी 25 जण आयझॉल जिल्ह्यात खाण कोसळून मरण पावले. तर नागालँडमध्ये 4, आसाममध्ये 3 आणि मेघालयमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. याठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *