लोकसभा निवडणूक 2024; जमावाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन तलावात फेकल्या

कुलताई, 01 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. तसेच यावेळी पश्चिम बंगालमधील 9 जागांसाठी मतदान होत आहे. यादरम्यान, पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावर एक खळबळजनक घटना घडली आहे. पश्चिम बंगालमधील 24 परागणा जिल्ह्यातील कुलताई येथील एका मतदान केंद्रावर संतप्त जमावाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन पाण्यात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सेक्टर ऑफिसरने एफआयआर दाखल केला असून त्यासंदर्भात सध्या कारवाई केली जात आहे.

https://x.com/ANI/status/1796770141432402052

ईव्हीएम मशीन पाण्यात फेकली

या घटनेनंतर सेक्टर ऑफिसरला नवीन ईव्हीएम आणि कागदपत्रे देण्यात आली आहेत. त्यानंतर येथील सहा बूथवर पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी काही स्थानिक लोकांनी प्रथम निवडणूक आयोगाच्या टीमला येथे येण्यापासून रोखले. त्यानंतर त्यांच्यात बराचवेळ वाद झाला. त्यावेळी या जमावाने कुलताई येथील बूथ क्रमांक 40 आणि 41 वरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन पाण्यात फेकून दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. तर हा वाद कोणत्या कारणामुळे झाला? याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

पश्चिम बंगालमध्ये 9 जागांवर मतदान

या घटनेची माहिती मिळताच निवडणूक अधिकारी तेथे पोहोचले. निवडणूक या घटनेची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आज सातव्या टप्प्यात दमदम, बरासत, बशीरहट, जयानगर, मथुरापुर, डायमंड हार्बर, जादवपूर, दक्षिण कोलकाता आणि उत्तर कोलकाता या 9 मतदारसंघात मतदान होत आहे. या सर्व लोकसभेच्या जागा तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जातात. या जागांवर तृणमूल काँग्रेसचा ताबा आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील तृणमूल काँग्रेस या जागांवर विजय मिळवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *