अखनूर, 31 मे: (विश्वजीत खाटमोडे) जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी चाललेली बस 150 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातातील मृतांची संख्या आतापर्यंत 22 वर पोहोचली आहे. तर या यामध्ये 72 भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या अखनूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर येथील चौकी चोरा पट्ट्यातील तुंगी-मोर येथे काल हा अपघात झाला.
https://twitter.com/ANI/status/1796134120671821939?s=19
बसमध्ये 90 हून अधिक भाविक
अपघातावेळी या बसमधून सुमारे 90 हून अधिक भाविक प्रवास करत होते. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी स्थानिक लोकांच्या मदतीने बचाव पथकाने या बसमधील जखमींना बाहेर काढून त्यांना तातडीने अखनूर येथील एका रुग्णालयात दाखल केले. तसेच याठिकाणी पोलीस ही पोहोचले. यावेळी पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन ते रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवले. दरम्यान, या अपघाताचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या अपघाताचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.
https://twitter.com/ANI/status/1796427637285695869?s=19
डॉक्टर काय म्हणाले?
या अपघातातील जखमींच्या प्रकृतीबाबत आणि अखनूर बस अपघाताबाबत जम्मू येथील सरकारी रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. आशुतोष गुप्ता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हा एक दुःखद अपघात होता. 72 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने 22 जणांना प्राण गमवावे लागले. सध्या दोन रुग्ण आयसीयूमध्ये आहेत आणि आम्हाला आशा आहे की आम्ही त्यांना वाचवू शकू. सर्व रुग्ण व्यवस्थित आहेत, असे ते म्हणाले आहेत.
https://twitter.com/PMOIndia/status/1796149100473471234?s=19
पंतप्रधानांकडून आर्थिक मदत जाहीर
दरम्यान , या अपघाताच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. “अखनूरमध्ये बस अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे व्यथित झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासोबत माझे विचार आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येतील,” असे नरेंद्र मोदी यामध्ये म्हणाले आहेत.