अरविंद केजरीवाल यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; 2 जून रोजी आत्मसमर्पण करावे लागणार

दिल्ली, 29 मे: (विश्वजीत खाटमोडे) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जामीनाला 7 दिवसांची मुदतवाढ देण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांची ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना 2 जून रोजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, अरविंद केजरीवाल यांनी वैद्यकीय कारणास्तव हा जामीन 7 दिवसांनी वाढवावा, अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. अरविंद केजरीवाल यांचे वजन 7 किलोने कमी झाले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आणखी काही चाचण्या करण्याचा सल्ला दिला आहे, असे आम आदमी पक्षातर्फे सांगण्यात आले होते.

https://twitter.com/ANI/status/1795693383744426481?s=19

याचिका फेटाळली

केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि केव्ही विश्वनाथन यांच्या सुट्टीतील खंडपीठाकडे यासंदर्भात तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती. वैद्यकीय तपासणीसाठी अंतरिम जामीन एक आठवडा वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतू कोर्टाने आज त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1794974375692959923?s=19

भाजपची टीका

तत्पूर्वी, अरविंद केजरीवाल यांनी जमिनाची मुदत वाढवण्याची याचिका दाखल केल्यानंतर भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. “अरविंद केजरीवाल हे नौटंकी आहेत. संपूर्ण प्रचारादरम्यान त्यांची प्रकृती ठीक होती. कडक उन्हातही ते प्रचार करत होते आणि अजूनही पंजाबमध्ये प्रचार करत आहेत. अंतरिम जामीनाची मुदत वाढवण्यासाठी याचिका दाखल केली आहे. जर तुम्हाला काही नवीन आजार आहेत तर तुम्ही हे जाणूनबुजून करत आहात का? असा सवाल वीरेंद्र सचदेवा यांनी उपस्थित केला आहे.

कथित दारू प्रकरणात अटक

दरम्यान अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. यावेळी केजरीवाल सुमारे 51 दिवस दिल्लीच्या तिहार तुरूंगात होते. त्यानंतर 10 मे रोजी सुप्रीम कोर्टाने त्यांना 1 जूनपर्यंत जामीन मंजूर केला होता. केजरीवाल हे लोकसभा निवडणुकीचा प्रचार करू शकतील आणि प्रचारात भाग घेऊ शकतील, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्यांना 1 जूनपर्यंत जामीन दिला होता. त्यांचा हा जामीन 1 रोजी संपत आहे. त्यामुळे 2 जून रोजी अरविंद केजरीवाल यांना आत्मसमर्पण करावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *