नाशिकमध्ये एका सराफ व्यापाऱ्यावर इन्कम टॅक्स विभागाची कारवाई; 26 कोटींची बेहिशेबी रक्कम जप्त

नाशिक, 26 मे: (विश्वजीत खाटमोडे) नाशिक शहरातील एका सराफ व्यापाऱ्यावर इन्कम टॅक्स विभागाने मोठी कारवाई केली आहे. नाशिकमधील सुराणा ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानावर इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकली. या कारवाईत 26 कोटी रुपये रोख आणि 90 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे इन्कम टॅक्स विभागाने जप्त केली आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथे सुराणा ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान आहे. या ज्वेलर्सच्या दुकानावर इन्कम टॅक्स विभागाने छापा टाकला.

https://twitter.com/ANI/status/1794595361291706710?s=19

इन्कम टॅक्स विभागाची मोठी कारवाई

यावेळी आयकर विभागाने शनिवारी पहाटे हे ज्वेलर्सचे दुकान आणि त्याच्या मालकाच्या घरावर एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक दिवसभर ज्वेलर्सच्या दुकानाचे आर्थिक रेकॉर्ड, व्यवहार डेटा आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करीत होते. ही कारवाई जवळपास 30 तास सुरू होती. यावेळी त्यांच्याकडून एकूण 26 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेली रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना 14 तास लागल्याचे सांगण्यात येत आहे.

https://twitter.com/ANI/status/1794595940017574127?s=19

फर्निचरमध्ये रोकड लपवली

या सराफ व्यापाऱ्याने अज्ञात व्यवहार केल्यामुळे त्याच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. या छापेमारीत इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंगल्यातील फर्निचर फोडून रोख रक्कम जप्त केल्याचे सांगितले जात आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या या कारवाईने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास इन्कम टॅक्स विभाग करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *