राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अनेक नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

दिल्ली, 25 मे: (विश्वजीत खाटमोडे) देशात आज लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात मतदान सुरू आहे. यावेळी देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी दिल्लीतील राष्ट्रपती इस्टेट अंतर्गत असलेल्या डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यासोबतच उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी देखील आज दिल्लीतील एका मतदान केंद्रावर जाऊन मतदान जाऊन सहकुटुंब मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सुदेश धनखर या उपस्थित होत्या.

 

 

अनेक दिग्गजांनी केले मतदान

यासोबतच देशातील अनेक व्हीआयपी मतदारांनी आज मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांची आई आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत आज दिल्लीत मतदान केले. यावेळी मतदान केल्यानंतर मतदान केंद्रातून बाहेर पडताना राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्यासोबत सेल्फी घेतला. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सहकुटुंब दिल्लीतील सिव्हिल लाईन्स परिसरातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय माजी खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, भाजपचे लोकसभा उमेदवार मनोज तिवारी यांनी देखील आज मतदानाचा अधिकार बजावला.

पीएम मोदींचे आवाहन

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी आज सहाव्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करून जास्तीत जास्त देशवासीयांनी करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. “लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे की, जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्यासाठी पुढे यावे. प्रत्येक मत मोजले जाते आणि आपले मत देखील तितकेच महत्वाचे आहे! निवडणूक प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग असेल तेव्हाच लोकशाही बहरते. माता, भगिनी आणि मुलींना तसेच तरूण मतदारांना माझे विशेष आवाहन आहे की, त्यांनी मतदानाचा हक्क बजावावा.” असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *