मुंबई, 22 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या होमगार्डला एका पोलिसाने शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. शिवीगाळ केल्यामुळे त्याठिकाणी उपस्थित असलेले होमगार्ड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर चिडलेले हे सर्व होमगार्ड शिवीगाळ करणाऱ्या पोलिसाच्या अंगावर धावून गेले होते. त्यामुळे याठिकाणी मोठा गदारोळ निर्माण झाला होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार मुंबईतील खेरवाडी येथील असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, त्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
https://twitter.com/thepawanupdates/status/1793168381673423070?s=19
दरम्यान, हे सर्व होमगार्ड कोल्हापूर जिल्ह्यातील असून ते सर्वजण लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी मुंबईत गेले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचे काम आटपून ते कोल्हापूरला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर थांबले. मात्र, बरेच तास उलटून गेले तरीही कोल्हापूरला जाणारी रेल्वे आली नाही. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या सर्व होमगार्डने या रेल्वेची चौकशी एका पोलिसाकडे केली. तेंव्हा त्या पोलिसाने ही रेल्वे कधी येणार? हे सांगण्याऐवजी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यामुळे चिडलेले सर्व होमगार्ड शिवीगाळ करणाऱ्या पोलिसाच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर घटनास्थळी मोठा गदारोळ निर्माण झाला होता.
या घटनेनंतर होमगार्डनी शिवीगाळ करणाऱ्या त्या पोलिसाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिले आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर शिवीगाळ करणाऱ्या संबंधित पोलिसाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.