मुंबई, 20 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात सध्या मतदान सुरू आहे. या मतदानाची सकाळी 11 वाजेपर्यंतची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. महाराष्ट्रात आज धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण या 13 जागांवर मतदान होत आहे. राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 15.93 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 19.50 टक्के मतदान झाले आहे. तर कल्याण मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे सरासरी 11.46 टक्के मतदान झाले आहे.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1792444444324634832?s=19
दिंडोरीत सर्वाधिक मतदान
पाचव्या टप्प्यातील धुळे लोकसभा मतदारसंघात आज सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 17.38 टक्के मतदान झाले आहे. तसेच दिंडोरी मतदारसंघात 19.50 टक्के मतदान, नाशिक लोकसभा मतदारसंघात 16.30 टक्के मतदान, पालघर लोकसभा मतदारसंघात 18.60 टक्के मतदान, भिवंडी लोकसभा मतदारसंघात 17.79 टक्के मतदान, कल्याण लोकसभा मतदारसंघात 11.46 टक्के मतदान आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात सरासरी 14.86 टक्के मतदान झाले आहे.
पाहा मुंबईतील मतदानाची टक्केवारी
याशिवाय मुंबईतील 6 जागांमध्ये मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात सरासरी 14.71 टक्के मतदान झाले आहे. तर मुंबई उत्तर – पश्चिम मतदारसंघात 17.53 टक्के मतदान, मुंबई उत्तर – पूर्व मतदारसंघात 17.01 टक्के मतदान, मुंबई उत्तर – मध्य लोकसभा मतदारसंघात 15.73 टक्के मतदान, मुंबई दक्षिण – मध्य मतदारसंघात 16.69 टक्के मतदान आणि मुंबई दक्षिण मतदारसंघात सरासरी 12.75 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान ही टक्केवारी सकाळी 11 वाजेपर्यंतची असून, मतदानाची अंतिम आकडेवारी रात्री जाहीर होणार आहे. त्यामुळे मतदानाचा आकडा वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.