देशातील 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान, महाराष्ट्रातील 13 जागांचा समावेश

मुंबई, 20 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत 695 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भवितव्य आज इव्हीएममध्ये बंद होणार आहे. याशिवाय महाराष्ट्रात देखील 13 जागांवर आज मतदान होत आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. यासाठी निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व मतदान केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

https://x.com/ANI/status/1792367465655337220

दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात रायबरेलीमधून काँग्रेस नेते राहुल गांधी, अमेठीतून भाजपच्या स्मृती इराणी, लखनौमधून राजनाथ सिंह, मुंबई उत्तरमधून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, दिंडोरी मतदारसंघातून भारती पवार, कल्याण मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांसारख्या दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात शेवटच्या टप्प्यात मतदान

यंदाच्या लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यातील 4 टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया याआधीच पूर्ण झाली आहे. त्यामुळे राज्यातील लोकसभा निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा आहे. आजच्या दिवशी महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये मुंबईतील 6 जागांचा देखील समावेश आहे. पाचव्या टप्प्यात राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण या 13 जागांवर आज मतदान पार पडणार आहे.

या राज्यांत आज मतदान

पाचव्या टप्प्यात आजच्या दिवशी उत्तर प्रदेशातील 14, महाराष्ट्रातील 13, पश्चिम बंगालमधील 7, बिहारमधील 5, ओडिशातील 5, झारखंडमधील 3, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेवर मतदान होणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. पाचव्या टप्प्यातील लोकसभेच्या 49 जागांवर सुमारे 8.95 कोटींहून अधिक मतदार आहेत. यामध्ये 4.69 कोटी पुरूष आणि 4.26 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *