मुंबई, 18 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आज सायंकाळी थांबणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला जात आहे. त्यासाठी राज्यात आज प्रमुख राजकीय नेत्यांच्या सभा आणि रॅली यांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी 49 जागांवर मतदान होणार आहे. या दिवशी 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 695 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. या काळात रायबरेली, अमेठीसह अनेक जागांवरही मतदान होणार आहे.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1791717856888995940?s=19
महाराष्ट्रात 13 जागांसाठी मतदान
पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14, महाराष्ट्रातील 13, पश्चिम बंगालमधील 7, बिहारमधील 5, ओडिशातील 5, झारखंडमधील 3, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील मोहनलाल गंज, लखनौ, रायबरेली, अमेठी, जालौन, झाशी, हमीरपूर, बांदा, फतेहपूर, कौशांबी, बाराबंकी, फैजाबाद, कैसरगंज आणि गोंडा या 14 जागांवर मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण अशा 13 मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे.
या मतदारसंघात मतदान
सोबतच बिहार मधील सीतामढी, मधुबनी, मुझफ्फरपूर, सारण आणि हाजीपूर या जागांवर, ओडिसा मधील बारगढ, सुंदरगढ, बोलंगीर, कंधमाल आणि आस्का, झारखंड मधील चतरा, कोडरमा आणि हजारीबाग, पश्चिम बंगालमधील बनगाव, बराकपूर, हावडा, उलुबेरिया, श्रीरामपूर, हुगळी आणि आरामबाग, जम्मू आणि काश्मीर मधील बारामुल्ला आणि लडाख येथे लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावणार आहेत.
या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
दरम्यान पाचव्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये राहुल गांधी, स्मृती इराणी, पियुष गोयल, राजनाथ सिंह, वर्षा गायकवाड, वकील उज्ज्वल निकम, श्रीकांत शिंदे यांसारख्या दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये 20 मे रोजी ईव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे. त्याचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.