नरेंद्र मोदी यांची आज शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा! राज ठाकरे सभेला उपस्थित राहणार

मुंबई, 17 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराला आता वेग आला आहे. पाचव्या टप्प्यात येत्या सोमवारी (दि.20) मतदान होणार आहे. तर या प्रचाराचा उद्या अंतिम दिवस आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वच राजकीय पक्षांच्या सभा आणि रॅली यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा होणार आहे. यावेळी मोदींच्या सभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे या प्रमुख नेत्यांसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

https://twitter.com/ddsahyadrinews/status/1791306269749293366?s=19

https://twitter.com/mnsadhikrut/status/1791096272176222604?s=19

नरेंद्र मोदी – राज ठाकरे एकाच मंचावर 

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाजी पार्क सभेसाठी निमंत्रित केले होते. या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राज ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्या आजच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राज्यातील मनसे कार्यकर्ते सध्या महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. आता शिवाजी पार्कच्या सभेत नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. त्यामुळे या सभेत राज ठाकरे काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

https://twitter.com/INCMaharashtra/status/1791105455621640409?s=19

इंडिया आघाडीची मुंबईत प्रचार सभा 

तर दुसरीकडे इंडिया आघाडीची आज मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुल याठिकाणी प्रचार सभा होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या प्रचार सभेला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या प्रचार सभांच्या निमित्ताने आजच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सामना रंगणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *