बारामती लोकसभा मतदारसंघात EVM ठेवलेल्या गोडवूनमधील सीसीटीव्ही 45 मिनिटे बंद! सुप्रिया सुळे यांनी केली कारवाईची मागणी

बारामती, 13 मे: (विश्वजीत खाटमोडे) बारामती लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान पार पडले. त्यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम ठेवलेल्या गोडावूनमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर आली आहे. या गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे आज सकाळी तब्बल 45 मिनिटे बंद असल्याचे सांगितले जात आहे. त्यावरून बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी ही बाब संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी गोदामातील बंद पडलेल्या सीसीटीव्हीचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

https://twitter.com/supriya_sule/status/1789911888601759976?s=19

सुप्रिया सुळे यांनी काय म्हटले?

बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या इव्हीएम ज्या गोडावूनमध्ये ठेवल्या आहेत, तेथील सीसीटिव्ही आज सकाळी 45 मिनिटे बंद पडले होते. इव्हीएम सारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटिव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे. तसेच हा खुप मोठा हलगर्जीपणा देखील आहे. याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे आलेली नाहीत. याखेरीज सदर ठिकाणी टेक्निशियन देखील उपलब्ध नाही. तसेच आमच्या प्रतिनिधींना इव्हीएमच्या स्थितीची पाहणी देखील करु दिली जात नाही. हे अतिशय गंभीर आहे. निवडणूक आयोगाने तातडीने याची दखल घेऊन सीसीटिव्ही का बंद पडला याची कारणे जाहिर करावी. याखेरीज संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर उचित कारवाई करणे गरजेचे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1789911618534396362?s=19

रोहित पवारांकडून शंका उपस्थित

तसेच आमदार रोहित पवार यांनी देखील या या सर्व प्रकरणाची गंभीर सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील इव्हीएम ठेवलेल्या गोडवूनमधील सीसीटीव्ही 43 मिनिटं बंद असल्याची माहिती ही धक्कादायक आहेच पण काही गैरप्रकार करण्यासाठी तर जाणीवपूर्वक हा प्रकार केला नाही ना, अशी दाट शंका येते. ज्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर आवश्यक असतं त्याप्रमाणे इव्हीएम च्या गोडावूनमध्येही सीसीटीव्ही यंत्रणा सुरू असणं आवश्यक आहे. निवडणूक आयोग कमी पडत असेल तर ही निवडणूक निष्पक्षपणे कशी म्हणता येईल? या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी या ट्विटमध्ये केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *