लोकसभा निवडणूक; चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार!

पुणे, 11 मे: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यांमध्ये येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. यामध्ये पुणे, मावळ, शिरूर, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, शिर्डी, बीड या जागांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या पक्षातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज प्रमुख नेत्यांच्या सभा आणि रॅली पार पडणार आहेत.

नेत्यांच्या सभा आणि रॅलीचा आज धडाका

निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ आज नंदुरबार येथे काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. यासोबतच पुण्यात आज शरद पवार, नितीन गडकरी, आदित्य ठाकरे, अमोल कोल्हे या नेत्यांच्या जाहीर सभा पार पडणार आहेत. तसेच सुप्रिया सुळे यांची आज पुण्यातील कोथरूड येथे रॅली पार पडणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चिंचवड येथे रॅली पार पडणार आहे. तसेच शिरूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी आणि अजित पवार यांची आज हवेली तालुक्यातील केसनंद फाटा येथे जाहीर सभा होणार आहे. यासोबतच महाविकास आघाडीचे शिरूर मतदार संघातील उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, आदित्य ठाकरे यांच्या आज शिरूर मतदारसंघात जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांची आज सभा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे नवनीत राणा यांच्या उपस्थितीत आज महिला मेळावा पार पडणार आहे. चौथ्या टप्प्यातील यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पुणे जिल्ह्यातील लढतींकडे लक्ष

दरम्यान पुणे जिल्ह्यातील पुणे, मावळ आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघात येत्या 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला जात आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघात तिरंगी लढत असणार आहे. यामध्ये महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटात सामना रंगणार आहे. शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस – पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून – शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत आहे. सोबतच मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगणार आहे. मावळमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून श्रीरंग बारणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजोग वाघेरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *