रोहित पवारांचा अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; पाहा अजित पवार काय म्हणाले?

काटेवाडी, 07 मे: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात पवार कुटुंबीय एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर, दोन्ही बाजूने सध्या आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या पक्षावर पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. रोहित पवारांनी काल मतदानाच्या आदल्या दिवशी ट्विट करून भोर आणि वेल्हे तालुक्यात पैसे वाटले असल्याचा आरोप अजित पवार गटावर केला आहे. या संदर्भातील काही व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केले आहेत.

 

रोहित पवारांचा आरोप

बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस…. यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय… यामध्ये भोर तालुक्यातील ‘अजितदादा मित्रमंडळा’चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसतायेत. यासाठीच पाहीजे होती का ‘Y’ दर्जाची सुरक्षा? विचारांची कास सोडलेल्यांना दिवसा सामान्य लोकांची कामं करता येत नाहीत. मात्र बारामती मतदारसंघात निवडून येण्यासाठी रात्रभर जे ‘उद्योग’ सुरू आहेत त्याचे हे व्हिडीओ.. तरीही स्वाभिमानी मतदार विकला जाणार नाही. अपेक्षा आहे निवडणूक आयोग झोपेत नसेल आणि यावर कायदेशीर कारवाई होईल. असे रोहित पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

रात्रीच्या 12 वाजल्या तरीही बँक सुरू?

सोबतच रोहित पवारांनी आणखी एक ट्विट करून वेल्हे तालुक्यातील एका पीडीडीसी बँकेची शाखा रात्रीच्या 12 वाजल्या तरीही सुरू असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात रोहित पवारांनी या बँकेचे व्हिडिओ ट्विट केला आहे. “पीडीडीसी वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलंय. आता रात्रीचे 12 वाजले तरी बँक सुरू आहे. कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर ओव्हर टाईम सुरू असावा,” असे रोहित पवारांनी यामध्ये म्हटले आहे.

अजित पवार काय म्हणाले?

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे काम निवडणूक आयोगाचे आहे. मी सात विधानसभा लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. मी असले प्रकार कधी करत नाही. कारण नसताना विरोधकांमधील काही बागलबच्चे अशा प्रकारचे आरोप करत आहेत. मात्र मी त्याला महत्त्व देत नाही. असे अजित पवार यावेळी म्हणाले. हे सगळं पाहण्याचे काम निवडणूक आयोगाचे अधिकारी, स्कोड, पोलीस यंत्रणा यांचे असते. मी पण तशा प्रकारचे आरोप करू शकतो. त्यांनी निवडणूक अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुकीची हाताळणी केला असा आरोप मी पण करू शकतो. असे अजित पवार म्हणाले.

बँक उघडी असल्याचे कोणी पाहिले का?

ती पीडीडीसी बँक 12 वाजल्यानंतर उघडी असल्याचे कोणी पाहिले का? तो व्हिडीओ कालचा त्या वेळेचाच होता का? असे सवाल अजित पवारांनी यावेळी केले. तसेच तो समोरचा जो आरोप करतोय ना त्याच्यावर काहीतरी परिणाम झाला आहे. त्यामुळे तो आरोप करतो. त्याच्या आरोपांना महत्त्व द्यावे असे माझ्या दृष्टीने वाटतं नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी रोहित पवारांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. ते आज काटेवाडी येथील मतदान केंद्राच्या बाहेर माध्यमांशी बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *