अजित पवारांनी कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला; अजित पवारांसोबत त्यांच्या आई!

काटेवाडी, 07 मे: (विश्वजीत खाटमोडे) देशात आज तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी आज बारामती मतदारसंघात मतदान पार पडत आहे. बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज काटेवाडी येथे कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या आई आशाताई अनंतराव पवार आणि त्यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.

माझी आई माझ्यासोबत!

यावेळी अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितले की, ही भावकीची गावकीची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. मात्र, समोरच्या लोकांनी पवार कुटुंबातील काही लोक त्यांच्यासोबत असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पवार कुटुंबामध्ये सर्वात ज्येष्ठ माझी आई आशाताई अनंतराव पवार आहे. आज माझी आई माझ्यासोबत आहे. याची नोंद सर्वांनी घ्यावी, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

श्रीनिवास पवारांनी केला होता दावा

तर काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांच्या आईला अजित पवारांचा भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय आवडला नसल्याचा दावा केला होता. दोघांच्या वादात पडायचे नाही म्हणून अजित पवार यांच्या आई पुण्यात बहिणीकडे राहायला गेल्या असल्याचे श्रीनिवास पवार यांनी यावेळी सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या आई अजित पवार यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, अजित पवार यांनी त्यांच्या आईला सोबत मतदानाला आणून विरोधकांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *