लोकसभा निवडणूक; पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क!

अहमदाबाद, 07 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात देशातील 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील एकूण 93 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये गुजरातच्या 25 जागांचा समावेश आहे. गुजरातमध्ये देखील आज 25 मतदारसंघांत मतदान पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात अहमदाबाद मधील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे, मोदींनी मतदान केलेल्या या मतदारसंघात गृहमंत्री अमित शाह हे भाजपचे उमेदवार आहेत.

 

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी साडेसातच्या सुमारास अहमदाबाद शहरातील निशान उच्च माध्यमिक विद्यालय येथील मतदान केंद्रावर दाखल झाले. यावेळी पंतप्रधान मोदींना पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. “आज मतदानाचा तिसरा टप्पा आहे. आपल्या देशात दानधर्माला महत्त्व आहे. त्याच भावनेने देशवासीयांनी जास्तीत जास्त मतदान करावे. आज मतदानाचा तिसरा टप्पा आहे, अजून चार फेऱ्या बाकी आहेत. मी नेहमी इथे मतदान करतो आणि अमित भाई भाजपचे उमेदवार म्हणून येथून निवडणूक लढवत आहेत. मी गुजरातच्या आणि देशातील मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो,” असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदींचे आवाहन!

तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ट्विट करून देशातील जनतेला जास्तीत जास्त मतदान करून मतदानाचा नवा विक्रम निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. “आजच्या टप्प्यात मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येने मतदान करावे, असे आवाहन करतो. त्यांच्या सक्रीय सहभागामुळे निवडणूका अधिक चैतन्यमयी होतील,” असे ट्विट नरेंद्र मोदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *