राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये पाहा कोणत्या जागेवर कशी लढत होणार?

बारामती, 06 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात उद्या 11 जागांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीचा प्रचार आता पूर्ण झाला आहे. राज्यात तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा आहे. बारामतीत यंदा पवार कुटुंबीय एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे येथील जनता कोणाच्या बाजूने मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सांगलीत तिरंगी लढत

त्याचबरोबर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विरुद्ध महाविकास आघाडीतील शिवसेनेचे अनंत गिते यांच्यात लढत होणार आहे. तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे नारायण राणे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात सामना रंगणार आहे. साताऱ्यात भाजप उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात लढत असणार आहे. तर सांगलीत यंदा तिरंगी लढत होणार आहे. सांगलीच्या जागेवर महाविकास आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागला आहे. काँग्रसचे विशाल पाटील यांना सांगलीची जागा मिळाली नाही. त्यामुळे ते सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे संजयकाका पाटील, तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

या लढतींकडे लक्ष

कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यात लढत होणार आहे. हातकणंकले लोकसभा मतदारसंघात देखील यंदा तिरंगी लढत होत आहे. या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, महायुतीकडून शिवसेना उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्यात लढत होणार आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपकडून सुधाकर श्रृंगारे आणि काँग्रेसकडून शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उस्मानाबादमध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यात सामना होणार आहे. तर सोलापूरमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे आणि महायुतीतील भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यात लढत होणार आहे. तसेच माढा लोकसभा मतदारसंघात यंदा महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात सामना रंगणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *