लोकसभा निवडणूक; तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला! देशात उद्या 93 जागांवर मतदान होणार

दिल्ली, 06 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळी निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. तिसऱ्या टप्प्यात देशातील 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 93 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. या टप्प्यात आसाममधील 04, बिहार 05, छत्तीसगड 07, दादरा नगर हवेली आणि दमन आणि बेटे 02, गोवा 02, गुजरात 25, कर्नाटक 14, मध्यप्रदेश 09 , महाराष्ट्र 11 , उत्तर प्रदेश 10, पश्चिम बंगाल मधील 04 जागांवर मतदान होणार आहे. दरम्यान, देशातील बहुतांश भागांत सध्या प्रचंड प्रमाणात उष्णता आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात मतदारांना घराबाहेर काढणे हे निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान असणार आहे.

एकूण 1331 उमेदवार रिंगणात

तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत एकूण 1331 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, यंदा लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडणार आहे. यापूर्वी, पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या 102 जागांवर आणि दुसऱ्या टप्प्यात 88 जागांवर मतदान झाले. आता उद्या तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. तर त्याच दिवशी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

राज्यात या जागांवर मतदान

महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या जागांचा समावेश आहे.

या लढतींकडे लक्ष

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील गुजरातमधील गांधी नगर, महाराष्ट्रातील बारामती, मध्य प्रदेशातील राजगड आणि यूपीमधील मैनपुरी मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात होणार आहे. गांधीनगरमध्ये भाजप उमेदवार अमित शाह काँग्रेस उमेदवार सोनल पटेल यांच्यात निवडणूक लढत आहे. राजगमध्ये दिग्विजय सिंग आणि रोडमल नागर आणि मैनपुरीमध्ये डिंपल यादव आणि जयवीर सिंग यांच्यात लढत असणार आहे. या लढतींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *